न्यायालयात स्नेहबंधाची अनोखी वीण; रक्षाबंधनानिमित्त सेंट्रल ॲडव्होकेट बारमध्ये जपला बहीण-भावाचा स्नेहबंध
बालभवनातील मुलींच्या राख्यांनी न्यायालयीन परिसर भारावला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वृद्धिंगत करणारा अनोखा उपक्रम जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथील सेंट्रल ॲडव्होकेट बारमध्ये उत्साहात पार पडला. स्नेहालयाच्या मलाला व उत्कर्ष या दोन बालभवनांतील बालिकांनी सेंट्रल ॲडव्होकेट बारमध्ये उपस्थित राहून बारमधील वकील बांधवांना राख्या बांधल्या. या उपक्रमामुळे न्यायालयीन परिसरात स्नेह, माया आणि बहीण-भावाच्या नात्याची भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नसून परस्परांप्रती प्रेम, विश्वास, संरक्षण, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. याच भावनेतून स्नेहालयाच्या मलाला व उत्कर्ष बालभवनातील मुलींनी वकील बांधवांना राख्या बांधत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
बालिकांनी अत्यंत उत्साहाने व प्रेमाने तयार केलेल्या राख्या वकील बांधवांच्या मनगटावर बांधल्या. राखी बांधताना बालिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उपस्थित वकील बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव या प्रसंगाचे विशेष आकर्षण ठरले. कायदेविषयक कामकाजासाठी नेहमी गंभीर वातावरण असलेल्या न्यायालयीन परिसरात या उपक्रमामुळे आपुलकीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी सेंट्रल ॲडव्होकेट बारचे अध्यक्ष ॲड. फारुक बी. शेख, उपाध्यक्ष ॲड. सौरभ काकडे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. के. एम. देशपांडे, ॲड. बिहानी, ॲड. पिंगळे, ॲड. एस. जे. काकडे, सचिव ॲड. अभिजीत देशपांडे, महिला सचिव ॲड. मृणाली वाळुंज यांच्यासह बारमधील अनेक ज्युनिअर ॲडव्होकेट्स उपस्थित होते.
राखी बांधल्यानंतर उपस्थित बालिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. सेंट्रल ॲडव्होकेट बारचे अध्यक्ष ॲड. फारुख शेख यांच्या वतीने तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. के. एम. देशपांडे यांच्या वतीने बालिकांना खाऊ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. वकील बांधवांकडून मिळालेल्या या प्रेमळ प्रतिसादामुळे बालिकांच्या आनंदात आणखी भर पडली. या उपक्रमातून रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. समाजातील वंचित व गरजू घटकांतील मुला-मुलींना आपुलकीची व सुरक्षिततेची भावना मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि समाजातील विविध घटकांनी त्यांच्याशी स्नेहाचे नाते जोडावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्कर्ष बालभवनच्या ॲड. बागेश्री जरंडीकर तसेच बालभवनातील रुबीना मॅडम, यास्मिन मॅडम, मीनाज मॅडम व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

