• Tue. Dec 30th, 2025

सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनची रंगली ‘बॉलीवूड नाईट’

ByMirror

Dec 24, 2025

रॅम्पवॉक, नृत्य, अभिनय आणि डायलॉगबाजीने कलागुणांचा उत्सव


बसंतीपासून गंगूबाईपर्यंत भूमिका साकारत महिलांनी जिंकली मने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बॉलीवूड नाईट’ कार्यक्रमात महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. रॅम्पवॉक, नृत्य, अभिनय, डायलॉगबाजी आणि अभियनांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह बॉलीवूडच्या रंगात रंगून गेले होते.
सामाजिक कार्यात सातत्याने सक्रीय असलेल्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने महिलांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना आत्मविश्‍वास आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्रींच्या वेशभूषा परिधान करत मंचावर दिमाखात प्रवेश केला.


‘शोले’ मधील बसंती, ‘गदर’ मधील सनी देओल, ‘पुष्पा’ची खास अदाकारी, तसेच ‘गंगूबाई काठियावाडी’च्या भूमिकेने उपस्थितांना खळखळून हसवले. ‘ब्लॅक’ चित्रपटातील काजोलची भूमिका साकारत एका महिलेनं भावनिक अभिनयातून प्रेक्षकांची दाद मिळवली. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, सायरा बानो, करिना कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका महिलांनी समर्थपणे साकारल्या. या सादरीकरणातून रॅम्पवॉकचा विशेष जलवा अनुभवायला मिळाला.


या कार्यक्रमास सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, डॉ. सिमरन वधवा, स्विटी पंजाबी, रितू वधवा, गितांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड, अन्नू थापर यांच्यासह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, आजची महिला घर, कुटुंब, नोकरी, समाजकार्य अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असते. मात्र या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःमधील कलागुणांना वाव देणे अनेकदा शक्य होत नाही. महिलांच्या मनात दडलेली कलाकार, अभिनेत्री, नृत्यांगना आज या मंचावर मुक्तपणे व्यक्त होताना पाहून अत्यंत आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट वेशभूषा, अभिनय, नृत्य, रॅम्पवॉक आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अलिशा मर्लिन यांनी केले. कशीश जग्गी यांनी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. तसेच विशिष्ट शैलीत त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ व बौद्धिक स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *