• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

50 वर्षानंतर शालेय मित्रांच्या भेटीने सर्वच भारावले

ByMirror

Aug 28, 2023

तब्बल अर्धशतकानंतर बॉईज हायस्कूलच्या मॅट्रिकचे माजी विद्यार्थी आले एकत्र

शालेय जीवनाच्या जुन्या आठवणीत रमले आजोबा

अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकानंतर मराठी मिशनच्या अहमदनगर बॉईज हायस्कूलचे सन 1973-74 च्या मॅट्रिक (इयत्ता अकरावी) बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र आले. सोशल मीडियाने जग जोडले जात असताना, तब्बल अर्धशतकानंतर माजी विद्यार्थी एकत्र येण्याची शहरात किमया घडली. सर्वच अजोबा झालेले व उतारवयाकडे वाटचाल करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल केली.


सन 1973-74 च्या मॅट्रिकच्या माजी विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपने जोडले जाऊन त्यांचा स्नेह मेळावा फरहत कॅफेमध्ये उत्साहात पार पडला. माजी शिक्षक रामदास काटे, दाऊद शेख व राणा त्रिभूवन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जणू वर्गच भरविण्यात आला होता. तब्बल 50 वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आलेल्या शालेय जीवनातील जुन्या मित्रांना ओळखणेही अवघड झाले होते. या जुन्या सवंगडींनी एकत्र येत शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. आपले लाडक्या प्राध्यपकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या.


हिरालाल चेंगेडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी अनिल औटी, जयसिंग आढाव, बंडू बनकर, संतोष देठे, सतीश जाधव, जफर खान, विनीत मकासरे, रावसाहेब नेटके, जगदीश नकवाल, सुधीर नवगिरे, नंदकिशोर परदेशी, किरण पवार, अविनाश रावडे, विजय सात्राळकर, अनिल सात्राळकर, हनिफ शेख, अल्ताफ शेख, शांतीलाल शिंगवी, बाळू शिंदे, भिम साळवे, रमेश थोरात, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.


प्रारंभी नुकतेच निधन झालेल्या वर्ग मित्र फारुक शेख यांना ग्रुपच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले. या स्नेह मेळाव्यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र आले होते.

लांब गेलेले मित्र अंतराने कितीही लांब असले तरी, वर्ग मित्रांच्या स्नेहबंधाने जोडले गेले आहे. वर्गमित्र या नात्याची गोड शिदोरी जीवनभर राहणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मुलांचे संसार थाटून, कुटुंबाची जबाबदारी पेलवून उतार वयाच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात विनित मकासरे यांनी ग्रुपची माहिती दिली. जफर खान व जयसिंग आढाव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल औटी यांनी केले. आभार विजय सात्राळकर यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *