निमगाव वाघा येथे 14 मे रोजी संमेलन; राज्यभरातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन 14 मे रोजी करण्यात आले असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक सरोज आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी 11 वाजता परिवार मंगल कार्यालय येथे या संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, संमेलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यावर आधारित ग्रंथ दिंडी गावातून काढण्यात येणार आहे.या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंतांचे परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलन, तसेच ग्रंथ प्रदर्शन यांचा समावेश असून, एक साहित्यिक पर्वणीच ठरणार आहे, अशी माहिती संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भूषविणाऱ्या सरोज आल्हाट या गेली 30 वर्षे साहित्य, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत एतिहासिक बहुभाषिक कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या मराठीत चार आणि इंग्रजीत एक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
पहिल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले आहे. आल्हाट यांची ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी गिताराम नरवडे, गझलकार रज्जाक शेख, भारत सातपुते, आनंदा साळवे, सुभाष सोनवणे, मिराबक्ष शेख, गुंफा कोकाटे, शंकर चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले.