ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा हृदयस्पर्शी उपक्रम; वंचितांची दिवाळी केली गोड
दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणल्याने दिवाळी उजळते -सुप्रिया चौधरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानरचना सोशल फाउंडेशन (कल्याण-ठाणे) क्षेत्रीय कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने वंचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. शहर व उपनगरात काच, कागद व भंगार गोळा करून उदनिर्वाह करणाऱ्या महिलांना साडी-चोळी आणि दिवाळी फराळ भेट देण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
भिंगार येथील इंदिरानगर येथे वास्तव्यास असलेल्या कचरावेचक महिलांना संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक साडी-चोळी व फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, संचालक प्रविण साळवे आणि भिंगार येथील भारत ठोकळ यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी परिसरातील महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद फुलला होता.
दिवाळीचा सण हा आनंद, प्रकाश आणि एकोपा यांचा प्रतीक मानला जातो. पण समाजातील काही घटक हा सण प्रत्येक वर्षी केवळ इतरांच्या घरातच बघत असतात. अशा वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा उद्देश ठेवून फाउंडेशनने माणुसकीची दिवाळी साजरी केली.
सुप्रिया चौधरी म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही या महिलांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवतो. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि चेहऱ्यावरचा हसू हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. खरी दिवाळी केवळ घरातल्या दिव्यांनी नाही, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणल्याने उजळते. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या घरात प्रकाश पसरवणे हीच खरी दिवाळी असल्याचे ते म्हणाल्या.
प्रविण साळवे म्हणाले की, आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. छोट्याशा प्रयत्नातून, एका छोट्या योगदानातून, कुणाचं आयुष्य उजळू शकतं. वंचितांची दिवाळी म्हणजे माणुसकीचा प्रकाश. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूच्या वंचित घटकांकडे हात पुढे करावा. आपल्यामुळे कुणाच्या आयुष्यात एक दिवा पेटला, हीच दिवाळीची खरी गोडी असल्याचे त्यांनी सांगितले.
