पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी
देवी उपासनेतून धैर्य, संयम आणि शक्तीची प्रेरणा मिळते -माणिक चौधरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सपत्निक श्री रेणुका माता देवीची आरती करून दर्शन घेतले. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
दररोज देवीच्या आरती, कीर्तन, गोंधळ, आदी धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले आहे. मंदीरात सजवलेल्या देवीचे आकर्षक मुर्ती, दिव्यांच्या रोषणाईत नटलेले मंडप आणि भक्तिरसपूर्ण वातावरण भाविकांचा उत्साह संचारला आहे. नवरात्रोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, तसेच विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
माणिक चौधरी म्हणाले की, नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो श्रद्धा, एकोपा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. आपल्या परंपरेनुसार देवी उपासनेतून आपण धैर्य, संयम आणि शक्तीची प्रेरणा घेतो. समाजातील प्रत्येकाने या उत्सवातून नवा उत्साह, सकारात्मक विचार आणि महिलांबद्दल आदर बाळगण्याची शिकवण घ्यावी, असे ते म्हणाले.