भिंक्तिरसात न्हाले भाविक
देशातील संतांची शिकवण संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथे संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. हा धार्मिक सोहळा शुक्रवार, 9 मे पर्यंत दररोज संध्याकाळी 6 ते 9.30 या वेळेत संपन्न होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 365 व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त व वै. लक्ष्मण रंगनाथ काळे, वै. विजयादेवी लक्ष्मण काळे तसेच वै. अजित लक्ष्मण काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष अनिता काळे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. निंबळकच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्रीनिवास महाराज घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, युवा उद्योजक अजय लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, साहेबराव बोडखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच प्रियंका लामखडे म्हणाल्या की, धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संतांचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतात. आपल्या देशाला लाभलेला धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता काळे म्हणाल्या की, आपल्या देशातील संतांची शिकवण संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक आहे. पौराणिक ग्रंथ व रामकथा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची शिदोरी आहे. निंबळक येथील राम कथेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सद्गुरु हृदय निवासी विठ्ठल बाबा देशमुख यांचे शिष्य श्रीनिवास महाराज घुगे कथेचे निरुपम करणार आहेत. रोज सायंकाळी सहा ते साडेनऊ या दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. निंबळक येथील सार्थक मंगल कार्यालयामध्ये हा सोहळा संपन्न होत आह. सोहळ्यानिमित्त कथा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संगीत राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा पहिल्याच दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाविक भक्तिरसात न्हाहून निघत आहे.