कथ्थक नृत्यकार पद्मश्री पुरू दधीची हस्ते झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांना त्यांनी दिलेल्या सांगितिक योगदानाबद्दल अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबई यांच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय गांधर्व महामंडळाच्या वाशी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मुळे यांना सुविख्यात कथ्थक नृत्यकार पद्मश्री पुरू दधीची यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, कोषाध्यक्ष डॉ. किशोर देशमुख, निबंधक विश्वास जाधव तसेच मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. देशातील 151 गुणी जणांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
परशुराम मुळे हे कर्जत तालुक्यातील मुळेवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच संगीत शिकण्याची आवड होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मिरजगाव येथील सोपान काका माने यांच्याकडे झाले. पुढे अहमदनगर येथील सुप्रसिद्ध गायक मकरंद खरवंडीकर तसेच पुणे येथील डॉ.उल्हास कशाळकर आदींकडून त्यांना संगीताची तालीम मिळाली. तर लातूरचे सुभाष महाराज देशमुख यांचे कडून त्यांनी तबला शिक्षण घेतले.
परशुराम मुळे यांनी स्वानंद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवीदिल्ली, गुवाहाटी, राजस्थान व हैदराबाद येथे पार पडलेल्या प्रशिक्षणात त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुग्गड, सर्व कर्मचारी वृंद तसेच स्वानंद शिक्षण संस्था व संगीत विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. मधुकर काळदाते आदींनी अभिनंदन केले आहे.