मराठा समन्वय परिषद, विजया लक्ष्मण काळे व हिरकणी ग्रुपचा संयुक्त उपक्रम
समाज घडविण्यासाठी महिलांना जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या विचाराने पुढे जावे लागणार -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषद, विजया लक्ष्मण काळे व हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला होता. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. महिला सक्षमीकरणासाठी सक्षम जिजाऊ-सावित्री अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी माही नगरसेविका दिपाली बारस्कर, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, डॉ. सुलभा पवार, रजनी भंडारी, राखी, मीनाक्षी जाधव, प्रतिभा भिसे, शोभा भालसिंग, अर्चना बोरुडे, मनिषा जाधव, मिनाक्षी मुनफन, स्वरा मुनफन, आशिष सुपेकर, निष्ठा सुपेकर, अभिलाषा वाघ, आरोही वाघ, भगवती चंदे, सारिका खांदवे, ज्योती भालेकर, शामल भालेकर, नमित भालेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांच्या हस्ते सक्षम जिजाऊ-सावित्री अभियानाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तर विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हळदी-कुंकूच्या सेल्फीपॉइंटने सर्व महिलांचे लक्ष वेधले.
अनिता काळे म्हणाल्या की, समाज घडविण्यासाठी महिलांना जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या विचाराने पुढे जावे लागणार आहे. आपल्या मुला-मुलींमध्ये संस्कार रुजविल्यास सक्षम समाज निर्मिती होणार आहे. कुटुंब सांभाळताना महिलांनी आरोग्याची देखील काळजी राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर सक्षम जिजाऊ-सावित्री अभियानाच्या माध्यमातून महिलांचे मानसिक, शारीरिक व आरोग्य चांगले राहण्यासाठी विशेष उपक्रम राबवून त्यांच्यात आरोग्याविषयी जागृती केली जाणार आहे. मुलींमध्ये समाजात पुढे जाताना एक आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. तसेच महिला-मुलींच्या सुरक्षितता व इतर प्रश्नांवर या अभियानाच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.