नाथांना 101 पदार्थांचा महाभोग; भाविकांना प्रसाद वाटप
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ मंदिरात सद्गुरु (बडे बाबा) मच्छिंद्रनाथजी महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.
या निमित्ताने नाथांना 101 पदार्थांचा महाभोग दाखविण्यात आला. विविध मिठाई, फलाहार, पारंपरिक पदार्थ व नैवेद्याचा मोठा थाट सजविण्यात आला होता. महाभोगानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.
ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते श्री नवनाथ मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी अभी पाचारणे, छगन भगत, सागर उधार, शेखर उधार, संदीप केदार, बाबा काळे, विठ्ठल फलके, शुभम फलके, अतुल फलके, प्रतीक ठाणगे, निरंजन पाचारणे यांच्यासह ग्रामस्थ व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी भक्तांना धर्ममार्ग दाखवला, सदाचरण, संयम आणि भक्तिभाव यांचे महत्त्व पटवून दिले. नाथ संप्रदायाने नेहमीच समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून मानवतेचा संदेश दिला आहे. या संतांनी केवळ धर्म नाही, तर लोकजीवन समृद्ध व्हावे, समाजात ऐक्य राहावे आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावावे, यासाठी कार्य केले. नाथ परंपरेतील संतांचे जीवन आपल्याला शांतता, समाधान आणि योग्य दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
