उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा खुलासा
जिल्हाध्यक्ष निवडीवरुन निर्माण झालेल्या वादावर जैसे थे परिस्थिती असल्याचा अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीवरून आता केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र आरपीआय पक्षात घमासान सुरू झाल्याचे चित्र आहे. यावर आता उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी फोनद्वारे संपर्क साधून रिपाईची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी अजून जाहीर झालेली नसताना साळवे यांना बढती कशी व त्यांच्या जागी नवीन जिल्हाध्यक्षाची निवड कशी? यावर खुलास करण्याचा प्रयत्न केला.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नियोजित दौऱ्यासाठी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बदल, उत्तर महाराष्ट्र कार्यकरणीत पद बहाली या सर्व बाबी आपल्या परस्पर झालेल्या आहे. मूळात या नियोजन बैठकीची माहितीच आपल्याला नव्हती, असा मोठा खुलासा करताना एका विभागाच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेले निर्णय मान्य होणारे नाहीत. मुळात उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी अजून जाहीर झालेली नाही. त्यासाठी पाचही जिल्ह्यातून नावे मागवली आहेत, त्यावर विचारमंथन होऊन राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहमतीने कार्यकारिणी घोषित होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारणी मध्ये जर कोणी परस्पर निवड घोषित केली असली तरी आपल्या पर्यंत आलेली नसल्याने त्यावर काही बोलायचे नसल्याचे प्रकाश लोंढे यांनी स्पष्ट केले.
दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या कडून हटवून कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांचा जिल्हाध्यक्षपदी केलेला फेरबदल आणि साळवे यांची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत सचिवपदी दिलेले पद यावर बोलताना लोंढे यांनी, मुळात आरपीआय पक्षात अशा पद्धतीने कधीही पदांमध्ये परस्पर बदल होत नाही. त्यासाठी पक्षाच्या संकेतानुसार बदल करावयाच्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत क्रियाशील सदस्य-पदाधिकारी यांची बैठक होते. त्यात पदे बदलणे, बढती आदी निर्णय होतात.
त्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांची संमती, मार्गदर्शन असते. तसेच कोणतेही पदाधिकाऱ्यांच्या पदात बदल करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले काळजी घेतात. तीस ते चाळीस वर्षे कार्यकर्ते-पदाधिकारी पक्षासोबत राबत असतात. अशा वेळी संघटनात्मक बदल करताना सर्वांचा सन्मान राखला जातो. हा पायंडा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाडून दिलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या धोरणाला व संकेतांना बाजूला सारून काही झालेले निर्णय वरिष्ठांपर्यंत आलेले नाहीत.
उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी लवकरच राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव यांच्या सोबत चर्चा करून घोषित केली जाईल, असे सांगत तो पर्यंत मला माहितीच नसलेल्या निर्णयावर काही बोलण्यास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी नकार देत एकप्रकारे सुनील साळवे बाबत परस्थिती जैसे थे असल्याचे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केला आहे.