कार्यशाळेत उलगडले पाश्चिमात्य ते पौर्वात्य नाट्य क्षेत्रातील बारकावे
नगर (प्रतिनिधी)- जेष्ठ रंगकर्मी अरुण कदम यांची मुक्तावकाश ते युक्तावकाश ही नाट्यकार्यशाळा सप्तरंग थिएटर्स व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेसाठी युवक-युवतींसह नाट्य रसिक उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन नटराज पूजनाने झाले. यावेळी सीएसआरडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, अरुण कदम, सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, डॉ. बापू चंदनशिवे, लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास एकसंबेकर, अभिनेत्री दया एकसंबेकर आदी उपस्थित होते.
मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांनी या कार्यशाळेत पाश्चिमात्य ते पौर्वात्य नाट्य कलेविषयक मार्गदर्शन केले. जागतिक रंगभूमी, भरतमुनी, अश्वघोष ते कालिदासापासूनची समृध्द परंपरा असलेला भारतीय नाट्यशास्त्र, चीन, जपानी रंगभूमीवरील पौर्वात्य नाट्यविचार आणि ग्रीक-रोमन, शेक्सपिअर, स्तानिस्लावस्की, पीटर ब्रूक यांचा पाश्चात्य रंगविचार या दोन्हींचा तौलनिक मागोवा यावेळी घेण्यात आला.

नाटक हे माध्यम लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांच्याकरिता सैध्दांतिक व प्रात्यक्षिक या दोन्ही अंगांनी उलगडत नेणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थीना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक संजय लोळगे, डॉ. सुनील कात्रे व कल्पेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी मानले.