• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारच्या शुक्लेश्‍वर स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात

ByMirror

Jul 29, 2026
तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा’ -जालिंदर बोरुडे

बोरुडे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल; नालेगाव येथील अमरधामच्या धर्तीवर सुसज्ज आरसीसी स्मशानभूमी उभारण्याची मागणी


‘तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा’ -जालिंदर बोरुडे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर छावणी प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. जीर्ण झालेले पत्र्याचे शेड, तुटलेल्या जाळ्या, पडझड झालेला प्रवेशद्वार आणि अन्य सुविधांची दुरुस्ती मंगळवार (दि. 28 जुलै) पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ तात्पुरत्या दुरुस्तींवर समाधान न मानता, अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील अमरधामच्या धर्तीवर आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज आरसीसी स्मशानभूमी उभारण्याची मागणी बोरुडे यांनी केली आहे.


भिंगार येथील शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील ही स्मशानभूमी भिंगारसह पंचक्रोशी आणि नागरदेवळे उपनगरातील हजारो नागरिकांच्या अंतिम संस्कारासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. दररोज अनेक अंत्ययात्रा येथे येत असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड पूर्णपणे जीर्ण झाले होते. अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडल्याने पावसाळ्यात शेडमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत होते. परिणामी, दुःखद प्रसंगीही नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.


पावसाच्या दिवसांत अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचल्यानंतरही पाऊस थांबेपर्यंत मृतदेहासह नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागत होती. अंत्यविधीची प्रक्रिया सुरळीत पार पाडणे अशक्य होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याशिवाय प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट मोडकळीस आले होते, बसण्यासाठीचे ओटे वरील जाळ्या तुटलेल्या होत्या आणि परिसरात आवश्‍यक मूलभूत सुविधांचाही अभाव जाणवत होता.


या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी छावणी प्रशासनाचे लक्ष वेधून निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली होती. तसेच, वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर छावणी प्रशासनाने त्वरित दखल घेत आवश्‍यक दुरुस्तीची कामे सुरू केली. सुरू असलेल्या कामांची पाहणीही जालिंदर बोरुडे यांनी प्रत्यक्ष जाऊन केली. बोरुडे यांनी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईचे स्वागत करताना, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असल्याचे स्पष्ट केले. दरवर्षी पत्र्याचे शेड बदलणे किंवा डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.



अहिल्यानगरच्या अमरधामच्या धर्तीवर आधुनिक स्मशानभूमीची मागणी
भिंगारमधील शुक्लेश्‍वर स्मशानभूमी ही हजारो नागरिकांच्या अंतिम संस्कारासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने तिचा सर्वांगीण विकास होणे आवश्‍यक आहे. अहिल्यानगरच्या नालेगाव येथील अमरधामच्या धर्तीवर या ठिकाणी पूर्णपणे आरसीसी बांधकाम असलेली, प्रशस्त आणि आधुनिक सुविधा असलेली स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी जालिंदर बोरुडे यांनी केली आहे. त्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करून मजबूत आरसीसी शेड, बसण्यासाठी प्रशस्त ओटे, सुरक्षित प्रवेशद्वार, स्वच्छ परिसर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि आवश्‍यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *