अहिल्यानगरच्या लेकीकडे महाराष्ट्राचे कर्णधारपद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू राणी कदम व सुमैया शेख यांची वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे. कदम हिच्याकडे महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. दोन महिला फुटबॉलपटूंची राज्यात झालेली निवड ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद व फुटबॉल खेळाला चालणा देणारी ठरली आहे.
राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई ट्रॉफी गुजरात येथे होणार असून, कदम व शेख या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाराष्ट्र संघासाठी आयोजित निवड शिबिरात अहिल्यानगर जिल्ह्यातून राणी कदम, सुमैया शेख व तनिषा शिरसूल या खेळाडूंना संधी मिळाली होती. त्यापैकी राणी कदम व सुमैया शेख अंतिम संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजीतसिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, प्रदीप जाधव, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, सदस्य राजू पाटोळे, जोएब खान, महिला संघाचे प्रशिक्षक शशांक वाल्मिकी, व्यवस्थापक काजल वाल्मिकी तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक, शाळा आणि क्रीडा संस्थांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
