शंभूराजे ग्रुपच्या उपक्रमांना पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्कृतीसोबत सामाजिक जाणिवा जोपासणे हीच खरी गणेशभक्ती -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) गावातील डोंगरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त शंभूराजे ग्रुपच्या वतीने महिला व युवतींसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पंचक्रोशीतील महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात अधिक रंगतदारपणे ही स्पर्धा पार पडली.
शंभूराजे ग्रुप, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी शंभूराजे ग्रुपच्या वतीने गावात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करुन धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शालेय विद्यार्थी व महिलांसाठी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी देखील विविध उपक्रम राबविण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वितरण स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंभूराजे ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रांगोळी स्पर्धेत प्रथम- समृध्दी संतोष येवले, द्वितीय- अक्षदा प्रविण येवले, तृतीय- निशा सुहास गुंजाळ, उत्तेजनार्थ- भक्ती संतोष जासूद तसेच मेहंदी स्पर्धेत प्रथम- समृध्दी संतोष जासूद, द्वितीय- भक्ती संतोष जासूद यांनी बक्षिसे मिळवली. या स्पर्धेचे परीक्षण पोलीस कॉन्स्टेबल प्रितम गायकवाड-आबुज व वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख यांनी केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धन यांचा मिलाफ आहे. शंभूराजे ग्रुपने महिलांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा घेऊन ग्रामीण भागातल्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया व युवतींमध्ये विविध कलागुण असून, अशा स्पर्धेतून त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.