अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सुखदा बोरकर यांच्या हस्ते उद्घाटन
युवकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यासाठी आई-वडिलांप्रती कृतज्ञता दाखविणारा देखावा -अभिनेत्री गौरी कुलकर्णी
नगर (प्रतिनिधी)- नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला हा ऐतिहासिक आणि भव्य देखावा भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सहकलाकार सुखदा बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, निवेदक प्रसाद बेडेकर, सुहास कुलकर्णी, सचिव आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, प्रकाश गांधी, अमित गांधी, अजित गांधी, सत्येन मुथा आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की, जय आनंद महावीर युवक मंडळाला 24 वर्षे पूर्ण झाली असून मंडळाची रौप्यमहोत्सवी वाटचाल सुरु आहे. व्यापारी मित्रांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या मंडळाने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढून ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक विषयांवर भव्य देखावे साकारले आहेत. यावर्षी राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला हा देखावा साकारण्यात आला आहे. याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, मंडळाच्या वतीने वर्षभर गरजूंना मदतीचा हात दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्या शहरात येऊन मिळालेला हा सन्मान एक मोठे सौभाग्य आहे. जय आनंद महावीर युवक मंडळाने गणेशोत्सव साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी जपली असून, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. आई-वडिलांप्रती कृतज्ञता ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युवकांना घेण्यासाठी हा देखावा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सुखदा बोरकर हिने नगरकरांनी दिलेल्या मान-सन्मानाने आणि येथील गणेशोत्सव पाहून भारावले असल्याची भावना व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सुखदा बोरकर यांना पाहण्यासाठी चाहत्या वर्गाने मोठी गर्दी केली होती. तर युवती व महिलांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतल्या.
या भव्य देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह 11 मूर्तींचा हलता देखावा साकारण्यात आला आहे. सूर्यग्रहण असताना छत्रपतींनी महाबळेश्वर येथील भगवान शंकराच्या प्राचीन मंदिरात, अष्टप्रधान मंडळाच्या उपस्थितीत, मातोश्री राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला केली. हा ऐतिहासिक क्षण मंडळाने जिवंत करून दाखविला आहे.
यंदाच्या उत्सवात मंडळाचे आधारस्तंभ असलेले स्व. योगेश (गुड्डू) मुनोत यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. मंडळाच्या कार्याचा गाडा त्यांनी दीर्घकाळ सांभाळला होता. सहा महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले, मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार सत्येन मुथा यांनी मानले.