• Thu. Feb 6th, 2025

शहरात पार पडली सर्व धर्म प्रार्थना

ByMirror

Feb 5, 2025

युवान व घर घर लंगर सेवेचा राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम

विविध राज्यातून आलेल्या युवक युवतींनी घडविले एकसंघ भारताचे दर्शन

नगर (प्रतिनिधी)- युवान व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातंर्गत शहरात धार्मिक, सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये सर्व धर्म प्रार्थना घेण्यात आली. सावेडी येथील माऊली संकुलात झालेल्या कार्यक्रमात विविध राज्यातून शिबिरात सहभागी झालेल्या युवक-युवतींनी त्यांच्या संस्कृतीचे सादरीकरण करुन एकसंघ भारताचे दर्शन घडविले. यावेळी 17 राज्यातील संस्कृतीवर आधारित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.


प्रारंभी बाबाजी गुरभेजसिंग, बाबाजी समर्थ सिंह, पास्टर प्रेमानंद मकासरे, मुन्ना पंडित, मौलाना यांनी त्यांच्या धर्माची प्रार्थना करुन धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. सर्व धर्म गुरुंच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राकेश गुप्ता, डॉ. अमित बडवे, सुफी गायक पवन नाईक, चंबळच्या घाटीत समर्पण केलेले डाकू बहादूरसिंग, मन्सूरभाई शेख, हरजितसिंग वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, मुन्नाशेठ जग्गी, किशोर मुनोत, सुनील थोरात, राजा नारंग, जतीन आहुजा, राहुल बजाज, राजू जग्गी, कैलास नवलानी, डॉ. खन्ना, हरीश हरवानी, सिमरन वधवा, अमरजीतसिंग वधवा, भरत बागरेचा, दलजीतसिंग वधवा, कन्हैय्या बालानी, राजेश कुकरेजा, अनिश आहुजा आदी उपस्थित होते.


शहरात राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिर सुरु असून, या शिबिरात 27 राज्यांतील सुमारे 400 युवक-युवती सहभागी झालेल्या आहेत. सात दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये नगर शहरांमध्ये विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व धर्म प्रार्थने आयोजन करण्यात आले होते.
राकेश गुप्ता म्हणाले की, सर्व धर्मिय देशात गुण्यागोविंदाने नांदत आहे, हीच भारताची खरी एकात्मता आहे. या एकात्मतेमध्ये देशाचा विकास आहे. भावी पिढीच्या कल्याणासाठी सर्व धर्माचा आदार करण्याचे संस्कार त्यांच्यात रुजविण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. अमित बडवे म्हणाले की, प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा पहिले भारतीय आहे. भारतामध्ये विविधतेने नटलेल्या अनेक जाती-जमाती असून, त्यांच्या योगदानाने देशाचा विकास साधला गेला आहे. प्रत्येक प्रांताची संस्कृती भाषा वेगळी असली तरी, भारतीय म्हणून सर्व एक असल्याचा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हरजीतसिंग वधवा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सनी वधवा यांनी पंजाबी समाजाबद्दल, डॉ. संजय असनानी यांनी सिंधी समाजाबद्दल, नरेंद्र बोठे यांनी मराठा समाजाबद्दल, सरोज कटारिया यांनी जैन समाजाबद्दल व सुप्रिया गांधी यांनी गुजराती समाजाबद्दल माहिती दिली. यावेळी युवानचे संदिप कुसळकर, सुरेश मैड, ॲड. श्‍याम आसावा, गीतांजली भावे, प्राजक्ता भंडारी, सुप्रिया दासी, सुवालाल (बापू) शिंगवी, रणसिंग परमार, कारायील सुकुमारन, मधुसूदन दास, नरेंद्र वडगावकर, प्रमोद पंतम, देवेंद्रसिंग वधवा, शरद बेरड, अमरजीत वधवा, सतीश गंभीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिमरनकौर वधवा व रुपेश पसपुल यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *