पंडित जवाहरलाल नेहरु पुतळा परिसर केला स्वच्छ
राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरातील उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- शहरात होत असलेल्या राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक युवा शिबिरात देशातील विविध प्रांतातून सहभागी झालेल्या युवक-युवतींनी लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरु पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. स्वछतेसाठी सरसावलेल्या युवक युवतींनी संपूर्ण पुतळ्याचा उद्यान परिसर चकाचक करुन एकप्रकारे पुनरुज्जीवन केले.
महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात देशभरातील 27 राज्यातील 350 पेक्षा अधिक तरुण स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. सर्व घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रादेशिक भाषेतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत, देश की ताकद नौजवान…, भाईजी की कामना, सद्भावना सद्भावना…, जोडो जोडो भारत जोडे…. या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. स्वच्छतेसोबत देशभक्तीपर गाणी देखील गाण्यात आली.

या स्वच्छता अभियानात महापालिकेचे अधिकारी शुभम पाटील, श्याम असावा, करायिल सुकुमारन, रणसिंग परमार, संदीप कुसाळकर, सुरेश मैड, पंकज झाला (गुजरात), यशपाल कपूर (हिमाचल प्रदेश), आशा राणी (हरियाणा), कनिका हजवडीकर (आसाम) अनन्या (मध्यप्रदेश) आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक डॅनियल आदींसह शिबिरातील युवक-युवती, महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश होता.
स्वच्छता करुन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल माहिती देतांना नेहरुजींनी त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे शहरातील भुईकोट किल्ल्यात लिहल्याची माहिती देण्यात आली.
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास युवान राष्ट्रीय युवा प्रकल्पाच्या सहकार्याने नगरच्या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे संदीप कुसळकर यांनी जाहीर केले.