वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना त्यांच्या अनन्यता या काव्य संग्रहासाठी पद्म गंगा फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय लोकगंगा साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. कै. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आल्हाट यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर, प्रा.डॉ. मुसा बागवान, प्रा.डॉ. संदीप सांगळे, डॉ. सुधाकर शेलार यांच्या उपस्थितीत आल्हाट यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सरोज आल्हाट यांचे यापूर्वी अश्रूंच्या पाऊलखुणा, कविता तुझ्या नि माझ्या, सखे असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अनन्यता या चौथ्या काव्यसंग्रहास हा पुरस्कार देण्यात आला. सरोज अल्हाट यांना त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी स्व. राजीव गांधी, मदर तेरेसा, आठवले साहित्य पुरस्कार, स्वानंद काव्य पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, राष्ट्र मित्र पुरस्कार, नेहरू युवा केंद्राचा युवा पुरस्कार, समाज ज्योत पुरस्कार, यमुना पर्यटनकार, बाबा पद्मंजी स्मृती पुरस्कार, अभिनव खानदेश पुरस्कार, इंडियन पिनॅकल अवॉर्ड, आयकॉन नॅशनल अवॉर्ड, राज्यस्तरीय कवयित्री शांता शेळके उत्कृष्ठ काव्य संग्रह पुरस्कार, राजे शिव छत्रपती प्रेरणा समाजरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार, साप्ताहिक उपदेशक पुरस्कार असे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सरोज अल्हाट यांनी विविध संस्थांमध्ये प्रकल्प संचालक, जनरल सेक्रेटरी अशा उच्च पदावर राहून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बालकल्याण, परित्यक्ता, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्न, कुष्ठरुग्ण, विट भट्टी व ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त आदी घटकांसाठी विकासात्मक व धोरणात्मक कार्यक्रमामध्ये त्या गेली 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक संस्था, रेडिओ तसेच साहित्यातून त्यांनी प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.