• Tue. Jul 1st, 2025

कवयित्री सरोज आल्हाट यांना महात्मा गांधी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

ByMirror

Sep 29, 2024

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महात्मा गांधी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. साहित्य व साहित्यातून समाजसेवा व प्रबोधन याकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे स्पर्श सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यचे संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांनी माहिती दिली आहे.


2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी पणजी (गोवा) येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते तथा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर व राज्यपाल यांच्या उपस्थितीत आल्हाट यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सरोज आल्हाट यांचे यापूर्वी अश्रूंच्या पाऊलखुणा, कविता तुझ्या नि माझ्या, सखे,अनन्यता,असे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.


सरोज आल्हाट यांना साहित्यिक क्षेत्रातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध संस्थांमध्ये प्रकल्प संचालक, जनरल सेक्रेटरी अशा उच्च पदांवर कार्यरत राहून दलित, पीडित शोषित, परित्यक्ता, आदिवासी, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्‍न, वीटभट्टी व ऊसतोड कामगार अनाथ, अंध, कुष्ठरोगी, एड्सग्रस्त इत्यादी घटकांसाठी विकासात्मक धोरणात्मक कार्यक्रमांमधून त्या गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहेत. साहित्यातून प्रबोधनपर व्याख्याने व त्यांचे लिखाण सुरु आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *