अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सातवा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे जनरल मॅनेजर मनोज काळे आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल संगमनेरचे प्राचार्य निलेश पाटील यांच्या हस्ते झाले.
विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंच्या हातातील मशाल घेऊन पाहुण्यांनी मैदानात संचलन केले. यावेळी विविध स्पर्धांना प्रारंभ करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक तसेच विविध सांघिक खेळासाठी चषक देऊन गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट हाउस म्हणून आक्वा हाउसला सांघिक चषक देण्यात आला. मनोज काळे यांनी आपल्या भाषणात खेळाचे महत्व व योग्य आहार, सराव तसेच खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टीवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालकांनी पोदार शाळेद्वारे 21 व्या शतकात मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल व खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले.
निलेश पाटील यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची प्रवृत्ती याबद्दल शाळा प्रशासनाची प्रशंसा केली. तर शाळेच्या सर्वोत्तम उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी पोदार शाळेचे व्यवस्थापक खेळासाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेले उपक्रम याबद्दल माहिती दिली. तर मुलांचा विकास होण्याच्या दृष्टीने खेळाचे महत्व मोठे आहे. मुलांमध्ये विविध गुण निर्माण होण्यासाठीच असे क्रीडा सप्ताह आयोजित केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यानी खेळाडूवृत्तीने खेळ खेळण्याची शपथ घेतली. शाळेचा ध्वज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फडकविण्यात आला. शाळेच्या वेंटस, आक्वा, इग्निस व टेरा गटातील विद्यार्थ्यानी संचालन केले. याप्रसंगी या क्रीडा सप्ताहमध्ये झालेल्या क्रिकेट, खोखो, कबड्डी, हॉलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच अशा विविध सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. तसेच धावणे, बुक बॅलन्सिंग, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा पार पडल्या.
विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रात्यक्षिके व नृत्याद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यानी कवायत, योगा, रिंग नृत्य, मल्लखांब, पिरॅमिड असे विविध खेळाचे प्रकार सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी सर्व पालकांसाठी संगीत खुर्ची व पोत्यांची रेस असे खेळ घेण्यात आले. यामध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेवटी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेमध्ये राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप, प्रशासन अधिकारी आशुतोष नामदेव आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली जगताप, अभिज्ञा कदम, दर्श देसर्डा आणि रुद्र आहेर या विद्यार्थ्यांनी केले. आभार शाळेची हेड गर्ल अनुष्का पांडे हिने केले.