नवनागापूरच्या श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय प्रारंभ; मोहटा देवीच्या ज्योतीने दीपमाळ प्रज्वलित
आरोग्य शिबिरे, धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा समावेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान स्ट येथे रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेनंतर देवीची आरती करण्यात आली. संबळाचा निनाद आणि देवीच्या आरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, पशुधनाचे रक्षण व्हावे, पाऊस पडावा आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवीच्या चरणी आमदार जगताप यांनी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी एमआयडीसी परिसरातून देवीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोहटा देवी येथून आणलेली पवित्र ज्योत घेऊन युवक सहभागी झाले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या ज्योतद्वारे मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. धार्मिक वातावरण, संबळाचा गजर आणि देवीच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री रेणुका माता देवस्थान हे नवनागापूर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवानिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. घटस्थापना कार्यक्रमासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नवनाथ कातोरे, संपत बारस्कर यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून लोकसहभागातून मंदिरात विविध सुधारणा करण्यात येत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. मंदिरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था करण्यात आली असून, भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी दररोज विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासोबतच भाविकांना आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंदिर परिसरात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर, होमहवन, देवीचा गोंधळ आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घ्यावे आणि आयोजित आरोग्य शिबिरांसह विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, “नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान हे जुन्या काळापासून असलेले जागृत देवस्थान आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. लोकसहभाग आणि ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरात नवनवीन सुधारणा करण्यात येत आहेत. दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांची गर्दी होत असून, मंदिरात महिला व पुरुषांना स्वतंत्रपणे दर्शन घेण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.”
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पावसाच्या परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, या पावसाळ्यात आणि गणेशोत्सवानंतरही पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे बळीराजा सुखावण्यासाठी, पशुधन वाचण्यासाठी पाऊस पडावा आणि दुष्काळ हटावा, यासाठी श्री रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांसह विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

