• Tue. Dec 30th, 2025

नायगाव येथे होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीसाठी शहरात नियोजन बैठक

ByMirror

Dec 28, 2025

जयंतीची जय्यत तयारी


शिक्षण, सामाजिक परिवर्तन व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची परंपरा पुढे नेणे काळाची गरज -ना. जयकुमार गोरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नायगाव येथे साजऱ्या होणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या अनुषंगाने तसेच विविध विकासकामांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक अहिल्यानगर शहरात पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून सामाजिक, राजकीय व महिला प्रतिनिधींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव भव्य, शिस्तबद्ध, प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक स्वरूपात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करुन नियोजन करण्यात आले.


या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, सामाजिक परिवर्तन व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची परंपरा पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य या जयंती उत्सवाच्या माध्यमातून व्हावे, असे सांगून नायगाव येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक, प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी ना. जयकुमार गोरे यांचे स्वागत करून जयंती उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.


या प्रसंगी संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर, सचिव प्रभू म. माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, कृषी उत्पन्न बाजार समिती (कर्जत) संचालक नंदकुमार नवले, भाजप अोबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, सभापती नंदू काका नवले, श्रीगोंदा नगराध्यक्ष सुनीता ताई खेतमाळीस, दादासाहेब सोनमाळी, आबासाहेब खारे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, ऋषिकेश शेलार, सचिन म्हेत्रे, एम. डी. शिंदे (माजी नगराध्यक्ष), अमित मंडलिक, अशोक गोरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अमर हजारे यांनी करुन दिला. या बैठकीत जयंती उत्सवाची सविस्तर रूपरेषा ठरविण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, समाजप्रबोधनपर उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्य, तसेच महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेनुसार समाजजागृती, शिक्षणाचा प्रसार आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देत जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्व स्तरातून उत्स्फूर्त सहकार्य लाभत असल्याने नायगाव येथे होणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व्यापक प्रमाणात यशस्वी ठरेल, असा विश्‍वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *