• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालया समोर धरणे

ByMirror

Jan 29, 2024

पेन्शन व इतर देयके तात्काळ मिळण्यासाठी जोरदार निदर्शने

थकित देयके मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे झाले अवघड

अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळात नसल्याने राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने सोमवारी (दि.29 जानेवारी) सर्जेपूरा, रामवाडी येथील एसटीच्या विभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
थकित देयके मिळण्यासाठी व प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी एसटीच्या सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर आदींसह जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा आर्थिक प्रश्‍न बिकट बनला आहे. जे कर्मचारी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शनचा लाभ सुरु झालेला नाही. तर ज्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली अशांना अद्याप पर्यंत पैसे मिळालेले नाहीत. तसेच मेडिकल बिल, कामगार करार फरक इत्यादीसाठी सेवानिवृत्त कर्मचारी वंचित आहे. महामंडळाकडे वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण दिले जात आहे. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले असल्याचे संघटनेच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.


सेवानिवृत्तांना हक्काची पेन्शन सुरु करताना विभागीय कार्यालयाकडून विलंब होत असून, जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सचिव तथा एसटी बँकेचे माजी संचालक शिवाजी कडूस यांनी आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला.


एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना (पती-पत्नी) सर्व बसेस मधून कायमस्वरूपी मोफत प्रवासची सुविधा मिळावी, सेवानिवृत्त नंतर आरोग्य सुविधा मिळाव्या, विधवा पत्नींना पूर्वी 75 वयापर्यंत मोफत बस सेवेचा पास दिला जात होता, परंतु त्यात बदल करून वयाची अट 65 केली असताना यामध्ये बदल करुन अजीवन पास मिळावा, सेवानिवृत्तीनंतर शिल्लक रजेचे पैसे मिळावे, स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांना आजपर्यंत स्वेच्छ निवृत्तीचे पैसे मिळाले नसून ते ताबडतोब देण्यात यावे, दहा वर्षापेक्षा अधिक सेवा केलेल्या, राजीनामा दिलेल्या व बडतर्फ केलेल्या माजी एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मोफत बस सेवेचा पास मिळावा, सेवानिवृत्तीनंतर चालू होणारी पेन्शन प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याची मागणी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन एसटी महामंडळाचे विभागीय कामगार अधिकारी एकशिंगे यांना देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *