माजी उपसरपंच अंकुश शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर रस्ता दुरुस्तीला वेग
सार्वजनिक बांधकाम विभागाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे या महत्त्वाच्या जोडरस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कर्जुनेखारे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर सदर रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.
मौजे नागापूर-निंबळक-इसळक व कर्जुनेखारे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून वाहनचालक व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कर्जुनेखारे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. शेळके यांनी 18 नोव्हेंबर रोजी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अधिकृतरीत्या तक्रार दाखल करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, बराच कालावधी लोटूनही काम सुरू न झाल्याने त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. यासोबतच, पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून सध्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या रस्ता पॅचिंग कामाची पाहणी माजी उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी केली. यावेळी निंबळक ग्रामपंचायतचे माजी सदस्य बि. डी. कोतकर, महेश म्हस्के, सचिन कोतकर, प्रवीण झुगे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शेळके यांनी सांगितले की, या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत होती. तसेच अपघातांचे प्रमाण वाढले होते. प्रशासनाने वेळेत काम सुरू केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून भविष्यात रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
