समाज संस्कारी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी लागणार – मौलाना शफीक कासमी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करण्यासाठी मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत जलसा ए सिरतून नबी (स.) उपक्रमातंर्गत स्पर्धा पार पडली. यामध्ये मुलांना धार्मिक शिक्षणावर आधारित प्रश्न विचारुन ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितलेला जीवन मार्गाची माहिती देण्यात आली.
पी.ए. इनामदार यांच्या संकल्पनेने इकरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर संस्थेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. मौलाना शफीक कासमी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा रंगली होती. यावेळी प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख आदींसह शिक्षक, पालक, शिक्षक संघाचे सदस्य व शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौलाना शफीक कासमी म्हणाले की, सध्याची पिढी सुधारली नाही, तर भावी पिढी चांगली घडणार नाही. फक्त शिक्षणाने समाज संस्कारी होणार नसून, त्याला धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी लागणार आहे. मोहम्मद पैगंबर यांनी जीवनाचा आदर्श मार्ग दाखविला. त्यांची शिकवण समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी होती. त्यांनी दाखवलेला मार्ग सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य हारुन खान म्हणाले की, मोहम्मद पैगंबरांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनाची वाटचाल करावी. पालकांनी देखील मुलांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी त्यांना धार्मिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत विविध गटात प्रश्नोत्तरी रुपाने स्पर्धा पार पडली. यामध्ये पी.ए. इनामदार शाळेसह, अहमदनगर उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रथम विजेत्यास 3 हजार, द्वितीय क्रमांकाला 2 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 1 हजार पाचशे रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस इकबाल सय्यद, सचिव विकार काझी व खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमय्या शेख यांनी केले. आभार निशात सय्यद यांनी मानले.