1 जून रोजी लोणीत उद्घाटन; जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 16 वर्षांवरील पुरुष व महिला खुल्या गटातील मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. 1 जून रोजी सकाळी 8 वाजता लोणी येथील पी. व्ही. पाटील (सिनियर) महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, ही स्पर्धा फक्त जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते खेळाडू गुणवत्ता प्रमाणपत्राच्या मानकरी ठरणार आहेत. याशिवाय, या गुणवंत खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा 21 ते 22 जून दरम्यान पुणे किंवा मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे. राज्य गुणवत्ता प्रमाणपत्र 5% नोकरी राखीव कोट्यात उपयोगी ठरणार आहे. तसेच, राज्य व जिल्हा स्तरावरील सहभाग प्रमाणपत्र लष्कर भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.
प्रवेश अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, स्पर्धेच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सर्व खेळाडूंनी ओरिजिनल आधार कार्ड अनिवार्यपणे सोबत आणावे. भालाफेक व हातोडाफेक या प्रकारात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी स्वतःचा भाला व हातोडा बरोबर आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव: 9226238536, राहुल काळे: 8830863116 व संदीप हारदे: 9657603732 यांच्याशी संपर्क करण्याचे म्हंटले आहे.
या खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत पुढील क्रीडा प्रकारांचा समावेश आहे:
धावणे- 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर, 10000 मीटर
चालणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक आणि लांबउडी, तिहेरी उडी