देवस्थानात वटवृक्ष लागवडीने निसर्गरम्य वातावरणात भाविकांना मिळणार सावली आणि शुद्ध हवा
पर्यावरण संवर्धनासह सावली आणि अध्यात्माचा संगम -शिवाजी पालवे
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने एक मंदिर, एक वटवृक्ष! या पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या अभियानाचा प्रारंभ पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावातून करण्यात आला. गावातील खंडोबा मंदिर परिसरात वटवृक्ष लावून या अभियानाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
गावातील विविध देवस्थान परिसरात वटवृक्ष लागवड करण्याचा संकल्प या अभियानाअंतर्गत करण्यात आला असून, मंदिर तेथे वटवृक्ष अशी संकल्पना यातून रुजवली जात आहे. यामुळे एकीकडे पर्यावरणाचे संवर्धन होणार असून दुसरीकडे भाविकांना सावलीसह शांततादायी वातावरण लाभणार आहे. कोल्हार गावात सुमारे 25 देवस्थाने असून या सर्व ठिकाणी वडाची झाडे लावली जाणार आहेत.
खंडोबा मंदिराच्या भूमिपूजनानंतर मंदिर परिसरात वटवृक्ष लावण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मोहन डमाळे, महादेव पालवे गुरुजी, भाऊसाहेब डमाळे, राजू डमाळे, शंकर डमाळे, अंकुश डमाळे, सुनिल डमाळे, किशोर पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, संजय जावळे, बबनराव पालवे, निवृत्त पोलिस अधिकारी शंकर डमाळे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, ॲड. संदीप जावळे, भाऊसाहेब पालवे, रोहिदास पालवे, रामभाऊ गिते, शहादेव पालवे, उत्तम डमाळे, धनाजी गर्जे, सुभेदार अशोक गर्जे, निलेश डमाळे, गणेश पालवे, लहु पालवे, तेजस पालवे, ओम पालवे, कार्तिक पालवे, अरुण पालवे, मिसाळ यांचा समावेश होता.
यावेळी गावातील युवक निलेश डमाळे व गणेश पालवे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्याच हस्ते वटवृक्ष लागवड करून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मंदिर परिसरात शुद्ध हवा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली वाढीस लागेल. पर्यावरण संवर्धनासह भाविकांना सावली आणि अध्यात्माचा संगम एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे सांगितले. आभार सुभेदार अशोक गर्जे यांनी मानले. या उपक्रमातून कोल्हार गावाने पर्यावरण रक्षणाचा सुंदर आदर्श उभा केला असून, अशाच प्रकारचा उपक्रम इतर गावांनीही राबवावा, असे आवाहन जय हिंद फाऊंडेशनने केले आहे.