अयोध्या येथे प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
शहरातील कारसेवकांचा सन्मान करुन साजरा करणार दीपोत्सव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी (दि.22 जानेवारी) अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, पंजाबी सेवा समिती, सेवाप्रीत व समर्पण ग्रुपच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात शहरातील कारसेवकांचा सन्मान केला जाणार असून, संध्याकाळी सर्जेपूरा परिसरातून भगवान श्रीरामची उत्सव मिरवणुक काढली जाणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व प्रदीप पंजाबी यांनी दिली.
मंदिरात सकाळी 11 ते 12.30 वाजेपर्यंत भजन, हनुमान चालिसाचे पठण, रामनामाचा जप होणार आहे. तर यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शहरातील कारसेवकांचा सन्मान केला होणार आहे. यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामची महाआरती करण्यात येणार आहे. तसेच अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहण्यासाठी भाविकांसाठी लाईव्ह प्रेक्षेपणची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
संध्याकाळी 6 वाजता गोगादेव मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात उत्सव मिरवणुक काढली जाणार आहे. यामध्ये प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या झांकीचा समावेश राहणार आहे. या सोहळ्यानिमित्त राधाकृष्ण मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवाची सांगता दीपोत्सव व फटाक्यांच्या आतषबाजीने होणार आहे. या सोहळ्यात सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन राधाकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.