• Wed. Nov 5th, 2025

ओम सानप यांची ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ByMirror

May 18, 2025

अहिल्यानगरचा मल्लखांबपटू राष्ट्रीय स्तरावर झळकणार

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनच्या वतीने नुकतेच ठाणे येथे निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक स्पर्धक खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून अहिल्यानगर जिल्ह्याचा खेळाडू ओम घनःश्याम सानप याची ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. 18 ते 22 मे दरम्यान दमन येथे पार पडणार आहे.


ओम सानप हा अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन व एम.एम.वाय.टी.सी क्लबचा कुशल खेळाडू असून, त्याने याआधी शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये दोन वेळा रौप्य पदक मिळवून आपली चमक दाखवली आहे. गेली पाच वर्षे तो एम.एम.वाय.टी.सी. क्लब, बालिकाश्रम रोड येथे प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे आणि आप्पा लाढाने यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे.


मल्लखांब या खेळात पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब व रोप मल्लखांब हे तीन प्रकार असतात. या तिन्ही प्रकारांमध्ये ओमने उत्कृष्ट सादरीकरण करत महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान निश्चित केले.


ओम सानपच्या या घवघवीत यशाबद्दल अहमदनगर मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले. यासोबतच शहराचे आमदार संग्राम  जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक  निखिल वारे,  अजिंक्य बोरकर,  संपत बारस्कर,  कुमारसिंह वाकळे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे,  विशाल गर्जे, प्रियंका खिंडरे व श्री. भाऊराव वीर आदींनी देखील ओमला पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


ओमने मिळवलेले हे यश केवळ अहमदनगरसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली  आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *