अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मल्लखांबपटू ओम घन:श्याम सानप याने उत्कृष्ट कवायतीचे चित्तथरारक सादरीकरण करुन राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. तर पुणे विभागाला सांघिक रौप्य पदक मिळवून दिले.
उदगीर (जि. लातूर) येथे नुकतीच राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा पार पडली. यामध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करताना ओम सानप याने यश मिळवले आहे. ओम हा शहरातील श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर व मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटरचा खेळाडू आहे. गेल्या चार वर्षापासून तो मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, आप्पा लाढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

तो राज्य क्रीडा शिक्षक संघाचे खजिनदार घन:श्याम सानप व चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका क्रांती सानप यांचा तो मुलगा आहे. तो ना.ज. पाऊलबुद्धे ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल मानधना चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन मानधना, प्राचार्य भरत बिडवे, क्रीडा शिक्षक महेंद्र थिटे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, दिपाली बोडखेआदींसह प्रशिक्षक व शिक्षकांनी ओम याचे अभिनंदन केले आहे.