ओमच्या कामगिरीने शहराचे नाव उंचावले
खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चेन्नई येथे नुकतेच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत अहिल्यानगर शहरातील ओम घनश्याम सानप या खेळाडूने देशात द्वितीय क्रमांक पटकावून शहराचे नाव उंचावले आहे. ओम सानपची या वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील 60 विद्यापीठांमधील मल्लखांबपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत मुंबई विद्यापीठ संघाने प्रथम क्रमांक, तर पुणे विद्यापीठ संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. ओम सानप हा पुणे विद्यापीठ संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरला.
पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या संघानेदेखील द्वितीय क्रमांक पटकावला. या संघामध्ये अहिल्यानगरच्या स्नेहल भोसले व प्राची खळकर या दोन्ही खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नगर जिल्ह्याचा मल्लखांब क्षेत्रातील प्रभाव आणखी वाढला आहे.
ओम सानप हा सारडा महाविद्यालय, येथील विद्यार्थी असून, तो महावीर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरचा खेळाडू आहे. यापूर्वी त्याने खेळो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. ओमला या यशाच्या वाटचालीत मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग, मल्लखांब प्रशिक्षक आप्पा लाढाने, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षिका प्रणिता तरोटे तसेच राष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक सुनील गंगावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
ओमच्या या कामगिरीबद्दल सारडा कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. संजय धोपवकर, ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संजय साठे, संघाचे टीम मॅनेजर अमित जीनसीवाले, तसेच अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, सचिव अनंत रिसे, खजिनदार होनाजी गोाडळकर, राष्ट्रीय खेळाडू नंदेश शिंदे व राष्ट्रीय पंच निलेश कुलकर्णी यांनी ओमचे अभिनंदन करत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
