राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला नुकतीच सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कडून अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून, गावात लवकरच अद्ययावत कुस्ती संकुल साकारले जाणार आहे. या व्यायाम शाळेतून ग्रामीण भागातील नवोदित कुस्तीपटूंना कुस्तीचे धडे व मार्गदर्शन मिळणार आहे.
या संकुलात पारंपरिक मातीचा आखाडा तसेच आधुनिक मॅटचा समावेश असणार आहे. यामुळे पारंपरिक व आधुनिक दोन्ही पद्धतींचा समन्वय साधत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कुस्तीमध्ये रुची असलेल्या गरजू व होतकरू मुले-मुलींना या संकुलात प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेच्या माध्यमातून तज्ज्ञ कुस्ती प्रशिक्षकांकडून विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार केले जाणार आहेत. शारीरिक ताकद, तंत्र, आणि आत्मविश्वास यांची संगती साधत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा मानस डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.
पै. नाना डोंगरे हे नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष असून, त्यांच्या दोन्ही मुली राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू आहेत, तर मुलगा सुद्धा कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. गावपातळीवर खेळाची रुजवणूक व्हावी आणि नव्या पिढीला व्यायामाचे महत्त्व कळावे, यासाठीच व्यायाम शाळा हे एक माध्यम ठरणार आहे. लवकरच संकुलाच्या उभारणीस प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पै. डोंगरे यांनी दिली. संस्थेला मिळालेल्या मान्यतेमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.