खेळातही शाळेच्या मुली आघाडीवर -वैशाली कोतकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. 17 वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धेत ओएसिस स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघांना आपली ताकद दाखवून दिली. अंतिम सामन्यात समर्थ विद्यालयावर 39 : 10 गुणांनी दणदणीत विजय मिळवत ओएसिस स्कूलने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजयी संघाला प्रशिक्षक सुभाष कनोजिया व छबुराव कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या यशामध्ये शाळेच्या डायरेक्टर वैशाली कोतकर, प्राचार्या कल्पना दारकुंडे, इन्चार्ज पांडुरंग गवळी व सुभाष पवार यांचेही मोलाचे योगदान लाभले. विजयानंतर शाळेचे अध्यक्ष भानुदास कोतकर व डायरेक्टर वैशालीताई कोतकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वैशाली कोतकर म्हणाल्या की, ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर आहेत. या स्पर्धेत मुलींनी दाखवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि संघभावना कौतुकास्पद आहे. या विजयाने केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्या कल्पना दारकुंडे म्हणाल्या की, मुलीं केवळ अभ्यासतच नाहीतर खेळातही पुढे आहेत. मोबाईलमध्ये गुरफटलेल्या मुला-मुलींनी स्वत:च्या सर्वांगीन विकासासाठी मैदानावर येण्याची गरज आहे. शाळेत विद्यार्थ्यांना खेळासाठी देखील प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर खेळाडूंनी आनंद व्यक्त करत मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले. पालकांनीही मुलींच्या यशाचा आनंद व्यक्त केला.