कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित
पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पर्यावरणपूरक पध्दतीने उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर करीत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करण्यात आली. तसेच संस्थेच्या वतीने गावात जल प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी जलकुंडात गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आवाहन करुन, युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे व तेजस्विनी सुभाष डोंगरे यांच्या हस्ते उत्थापन पूजा झाली. यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, मंदाताई डोंगरे, कृष्णा डोंगरे, जनाबाई शिंदे, कार्तिक डोंगरे, तेजस्विनी डोंगरे, रघुनाथ डोंगरे, राधिक डोंगरे, शिवा डोंगरे आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विहीर, बारव आदी ठिकाणी विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. हे जलसाठे दूषित करण्याऐवजी लाडक्या बाप्पाची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची गणेश मूर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या गणेशोत्सवात संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.