महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांप्रमाणे संचमान्यता करावी -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य व शेकडो शिक्षकांची नोकरी संकटात सापडली असल्याचे स्पष्ट करुन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने शैक्षणिक सत्र 2025-26 च्या संच मान्यतेसाठी न्यू एन्ट्री टॅब तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शैक्षणिक सत्र 2025-26 ची संच मान्यता 30 सप्टेंबर 2025 च्या आधार व्हॅलीड विद्यार्थी संख्येवर करण्याची कार्यवाही सुरू आहे. याकरिता आधार नोंदणी, दुरुस्ती, अद्यावतीकरण करण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने करण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शाळेत प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये नव्याने प्रवेश घेतला आहे. त्यांनी यु-डायस प्रणाली मध्ये नोंदणी करण्यासाठी शासनाकडून न्यू एन्ट्री टॅब उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे यु-डायस प्रणालीमध्ये नोंदणीच होणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी संख्या संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार नाही.
परिणामतः नोंदणी न झालेल्या विद्यार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहतील तसे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदाची संख्या कमी होऊन मोठ्या प्रमाणात कार्यरत शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरण्याचा धोका स्पष्ट करण्यात आला आहे.
एकूणच शाळेतील शैक्षणिक व प्रशासनिक व्यवस्थेत प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण होऊन शैक्षणिक व्यवस्था उध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. न्यू एन्ट्री टॅब उपलब्ध करून न देण्याची कृती अत्यंत गंभीर स्वरूपाची व अशैक्षणिक असून अस्तित्वात असलेल्या शाळा उध्वस्त करणारी असल्याचे म्हंटले आहे.
राज्यातील शालेय शिक्षण विभागाने युडायस प्लस पोर्टलवरील फक्त वैध आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावी, असा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य व शेकडो शिक्षकांची नोकरी दोन्ही संकटात सापडली आहेत. संचमान्यतेसाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर दररोज शाळेत उपस्थित राहणारे पण आधारकार्ड व्हॅलिडेशन पूर्ण न झाल्यास हजारो विद्यार्थी अवैध ठरून शेकडो शिक्षक अतिरिक्त होतील.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी सेतू कार्यालयातील आधार कार्ड अपडेट झाले नाही. तसेच काही शाळा देखील बंद होत्या, वीज नसणे व काही अनेक तांत्रिक कारणांनी आधार अद्यावतीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संचमान्यता करताना वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांची प्रशासनाने आपापल्या यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्यता पहावी व हजर विद्यार्थ्यानुसार संचमान्यता करण्यात यावी. -बाबासाहेब बोडखे (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)