भक्तिरसात रंगलेले नऊ दिवसांचे धार्मिक सोहळे
पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता होम-हवनाने वेद मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. मंदिर परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत जगदंबा मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, पूजा, देवी चालीसा, हरीपाठ, भजन-कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले.
संपूर्ण उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दररोज महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले जगदंबा मातेचे मंदिर हे स्थानिकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर करण्यात आले असून, त्याला जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे.
नवरात्रोत्सव काळात येथे दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीय वाढते. मंदिराच्या सभोवती सजवलेल्या रांगोळ्या, विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य खुलून निघाले होते.
या धार्मिक उत्सवाच्या सांगता सोहळ्याला सरपंच उज्वला कापसे, उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, अरुण कापसे, बापू फलके, शिवाजी जाधव, अतुल फलके, सुनिता जाधव, सागर कापसे, मिरा जाधव, ज्योती फलके, नवानथ हारदे, भरत बोडखे, एकनाथ जाधव, कुमार फलके, अनिल डोंगरे, संग्राम केदार, अनिल पाटील फलके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तांनी देवीसमोर मनोभावे नवस फेडले, यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामुदायिक सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला.