• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

रंगपंचमीसाठी विद्यार्थ्यांनी बनवले नैसर्गिक रंग

ByMirror

Mar 28, 2024

सामाजिक वनीकरण व हरियाली संस्थेची नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

घरच्या घरी नैसर्गिक रंग निर्माण करुन रंगपंचमी उत्साहात साजरी करावी -हेमंत उबाळे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभाग व हरियाली संस्थेच्या वतीने रंगपंचमीनिमित्त नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा राबविण्यात आली. विविध शाळेत फळे, फुले, पाने यांपासून आकर्षक व शरीराला हानिकारक नसलेली पर्यावरणपुरक रंग निर्मितीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील रंगपचमीत रासायनिक रंगाचा वापर न करता, नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचा संकल्प केला. या कार्यशाळेत 3 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नैसर्गिक रंग तयार केले.


शहरातील दादा चौधरी विद्यालय, रेणावीकर विद्यालय, दादा चौधरी मराठी शाळा, प्रगत विद्यालय व निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सामाजिक वनीकरणचे वन परीक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी विविध आजार व विकार यांचा सामना करायचा नसेल, तर घरच्या घरी नैसर्गिक रंग निर्माण करुन रंगपंचमी उत्साहात साजरी करावी. ग्रामीण भागात पाणी टंचाई असून, पशु-पक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करत असताना, नागरिकांनी रंगपंचमीत मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय कमी करुन या सण-उत्सवाचा आनंद घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी रासायनिक रंगाचे दुष्परिणाम सांगताना काळा, हिरवा, सिल्वर, निळा, लाल हे रंग ऑक्साईड, कॉपरसल्फेट, ॲल्युमिनीयम ब्रोमाईड, प्रशियन निळ, मक्युरी सल्फाईट या रसायनापासून रंग तयार करण्यात आलेले आहे. हे सर्व रसायने त्वचेला घातक असून, त्यांपासून मूत्रसंस्थेचे कार्य बंद पडणे, डोळ्यांना ॲलर्जी, डोळे सुजणे व तात्पुरता आंधळेपणा, कॅन्सर, त्वचेचे विविध आजार होतात. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक रंग सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून बिट फळापासून जांभळा रंग, बेलफलाची साल, हळद यांपासून पिवळा रंग, आवळा व कोळसा पासून काळा रंग, जास्वंद, पळस, झेंडू, गुलाब यांपासून लाल रंग, गहू, ज्वारी, पुदिना, पालक यांपासून हिरवा रंग तर कपड्याची निळ पासून निळा रंग विद्यार्थ्यांनी बनविले.


या कार्यशाळेसाठी वनपाल, सचिन गायकवाड, वनरक्षक अफसर पठाण, मुख्याध्यापक सुभाष येवले, सायसिंग वसावे, उत्तम कांडेकर, मुख्याध्यापिका नंदा कानेटकर, शिक्षक अजय महाजन, प्रदीप भोसले, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अमोल वाबळे, तृप्ती वाघमारे, सुवर्णा जाधव, दिलीप परसपाटकी, प्रिया आहिरे, वैशाली डफळ आदी उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *