राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली कुडिया यांच्या कला क्षेत्रातील कार्याची दखल
कलेने जीवनात समाधान व आत्मविश्वास निर्माण होतो -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- कलेने जीवनात समाधान व आत्मविश्वास निर्माण होतो. प्राथमिक शिक्षणात मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी कलेला महत्त्व असून, मुलांमधील उपजत कलागुणांना प्रोत्साहन मिळत आहे. अरविंद कुडिया यांनी आपल्या कला साधनेने अनेक विद्यार्थी घडविले आहे. तर कला जोपासताना त्याची दखल दिल्ली पर्यंत घेण्यात आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.
भिंगार मधील छावणी परिषद शाळेचे कलाशिक्षक अरविंद कुडिया यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रा. विधाते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, अमोल भास्कर, स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, छावणी परिषदच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे, महात्मा गांधी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रुबिना शेख, शरद पुंड, अंकुश शेळके, सोनाली झिरपे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे प्रा. विधाते म्हणाले की, कलेतून भाषा, संस्कृती व परंपरेची जोपासना होत असते. मनुष्याला निसर्गाकडून मिळालेल्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या डोळ्यातून तो जीवनातील रंगमय स्वप्न पहातो. चांगल्या कामाचे कौतुक व पाठीवर शाबासकीची थाप पडल्यास आनखी काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तर आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कुडिया यांचा गौरव करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक रोहित परदेशी यांनी केले. प्रा. विधाते यांनी कुडिया यांना मानपत्र देवून त्यांचा सत्कार केला. उपस्थितांनी कला शिक्षक कुडिया यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर रेखाटलेल्या चित्र प्रदर्शनाची पहाणी करुन चित्रांचे कौतुक केले.
मुख्याध्यापक राजेंद्र भोसले म्हणाले की, चित्रकलेच्या माध्यमातून कुडिया यांनी शहराचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. कलेची साधना करताना विद्यार्थ्यांमध्ये देखील कला रुजविण्याचे कार्य ते सातत्याने करत आहे. त्यांनी अनेक कलाप्रेमी विद्यार्थी घडविले असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना अरविंद कुडिया यांनी जीवनात मिळत असलेला सन्मान आत्मसात केलेल्या कलेमुळे व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
