सैनिकाची पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लष्करात कार्यरत असलेल्या कोळेकर आण्णा गंगाधर या सैनिकाच्या नावाने असलेल्या एचडीएफसी बँक खात्यातून गहाळ झालेल्या चेकबुकाचा वापर करून अनधिकृत पद्धतीने पैसे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराबाबत कोळेकर यांनी बँकेकडे तसेच तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आले आहे.
कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 01 डिसेंबर 2025 रोजी त्यांना मोबाईलवर खात्यातून 75 हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज प्राप्त झाला. घटना समजताच त्यांनी 02 डिसेंबर 2025 रोजी एचडीएफसी बँक, स्टेशन्स रोड शाखेत भेट देऊन चौकशी केली. तेथे बँकेने सांगितले की हा व्यवहार एचडीएफसी सावेडी (प्रोफेसर कॉलनी) शाखेतून चेकद्वारे झाला आहे. त्यानंतर कोळेकर यांनी सावेडी शाखेत संपर्क साधला तेव्हा बँकेच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खात्यातील पाच चेक क्रमांकांद्वारे दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी चेक पास होऊन रक्कम काढण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार कोळेकर यांनी स्पष्ट केले की, सन 2017/2018 दरम्यान त्यांनी स्वतःची जुनी सही बँकेत बदललेली आहे. तरीही, जुने चेकबुक, चुकीची/खोटी सही, आणि अनोळखी व्यक्ती, यांच्या माध्यमातून मोठ्या रकमेचा चेक व्यवहार कसा पास झाला? असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, सहीची पडताळणी करणे हे बँक कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे, मात्र चुकीच्या किंवा बनावट सह्यांसह चेक पास झाल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची किंवा सहभागाची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
कोळेकर यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी गुन्हा अद्यापि दाखल करुन घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मांडला असून त्यांनी खालील मागणी केली आहे फसवणुकीचा गुन्हा तातडीने दाखल करावा, जबाबदार बँक कर्मचारी व संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी व प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी कोळेकर आण्णा गंगाधर यांनी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास 13 डिसेंबर पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कोळेकर यांनी दिला आहे.
