पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा शिक्षकांचा आरोप; एजंटचे रेकॉर्डिंग सभागृहात वाजले
विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना सूचना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी गुरुवारी (दि.11 सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षक दरबार भरवला. या दरबारात आमदार दराडेंनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत अनेक मुद्द्यांवर फैलावर घेतले.
दरबाराच्या सुरुवातीसच काही शिक्षकांनी थेट आरोप केला की, विविध मान्यतांसाठी पैसे दिल्याशिवाय मंजुरी दिली जात नाही.
याच दरम्यान एका अपंग शिक्षकाच्या मान्यतेसाठी एजंटमार्फत मागण्यात आलेल्या पैशांच्या रेकॉर्डिंगची ध्वनिफीतही सभागृहात वाजवण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार दराडे यांनी स्पष्ट केले की, जर कोणत्याही कामासाठी आर्थिक व्यवहाराची मागणी होत असेल, तर संबंधित शिक्षकांनी अँटी करप्शन विभागाकडे व पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. अशा प्रकारच्या अन्यायाला बळी पडू नये.
या शिक्षक दरबाराला प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. तर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, सचिव संभाजी पवार, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रसाद शिंदे, सुनील दानवे, ज्ञानदेव बेरड, भाऊसाहेब रोहकले, मिथुन डोंगरे, तसेच जळगावचे शिक्षक नेते संभाजी पाटील आदींसह जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांनी दरबारात अनुकंपा धारकांची मान्यता, शालार्थ आयडी, प्राचार्य मान्यता, निवड श्रेणी मान्यता, शाळा स्वमान्यता, आरटीई प्रलंबित मान्यता, संच मान्यता (सन 2024-25) वाटप, मुख्याध्यापक रजा रोखीकरण, फरक बिल प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र, अंशतः अनुदानित शाळांचा वाढीव टप्पा, तसेच रिक्त पदे भरणे यासारखे मुद्दे मांडले. त्याचबरोबर सन 2022 पासून पीएफ स्लिप उपलब्ध करून द्याव्यात हीही मागणी झाली.
आमदार दराडे यांनी या सर्व प्रश्नांवर अधिकाऱ्यांना थेट विचारणा केली आणि हा दरबार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ आहे, अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा हेतू नाही. योग्य समन्वयाअभावी काही प्रश्न प्रलंबित राहिले, आता सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यावर तोडगा निघेल, असे स्पष्ट केले. शिक्षक दरबाराचे नियोजन वैभव सांगळे व आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे यांनी केले होते.