• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

ByMirror

Mar 1, 2026
मराठी भाषा हा आपला अभिमान -पै. नाना डोंगरे

कविता, निबंध स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शनाने विद्यार्थ्यांत मराठीप्रेमाची जागृती


मराठी भाषा हा आपला अभिमान -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोफ्लगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिचा इतिहास आणि आजच्या काळातील उपयुक्तता यावर प्रभावी मांडणी केली. विद्यालयात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तथा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, शिक्षकवृंद मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, शरद भोस, स्वाती इथापे, ग्रंथपाल बाळासाहेब कोतकर, निकिता रासकर-शिंदे, रेखा जरे-पवार, दिपाली ठाणगे, प्रमोद थिटे, तेजस केदारी तसेच श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, आप्पा कदम, प्रशांत जाधव, लहानू जाधव आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


या उपक्रमामागे मराठी भाषेचा गौरव वाढवणे, तिचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणे आणि नव्या पिढीत मराठीविषयी अभिमान व प्रेम निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. वि. वा. शिरवाडकर यांसारख्या महान साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मराठीला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासली तरच भाषेची खरी श्रीमंती कळेल. आज आयोजित केलेल्या कविता गायन, निबंध स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शन यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल आत्मीयता निर्माण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, मराठी भाषा हा आपला अभिमान आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. मराठी भाषा गौरव दिनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि तिचा सन्मान राखावा, हेच आजच्या कार्यक्रमाचे खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *