28 ऑक्टोबर रोजी चलो नागपूरची हाक; आंदोलनात सहभागी होण्याचे प्रहार दिव्यांग संघटनेचे आवाहन
दिव्यांगांची मानधन वाढ आणि शेतकरी कर्जमुक्तीची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग तालुकाध्यक्ष तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व दिव्यांग सदस्यांना नागपूर येथे होणाऱ्या महा एल्गार आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकरराव घाडगे आणि महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख यांनी केले आहे. हे आंदोलन 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचे मैदान, परसोडी, वर्धा रोड, जामाठा येथे होणार आहे.
या आंदोलनाद्वारे दिव्यांग बांधव आणि शेतकरी वर्गाच्या हक्क, आत्मसन्मान आणि अस्तित्वासाठीचा लढा उभारण्यात येणार आहे. प्रहार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, हा लढा केवळ आंदोलन नाही, तर दिव्यांगांच्या जगण्याचा प्रश्न आहे. आपल्या मागण्यांसाठी सर्वांनी एकदिलाने नागपूर येथे उपस्थित रहावे.
सध्या दिव्यांग बांधवांना मिळणारे अडीच हजार रुपयांचे मानधन सहा हजार रुपयांपर्यंत वाढवावे, अशी प्रमुख मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. सरकारकडे ही मागणी संघटितपणे नागपूर आंदोलनातून मांडली जाईल. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या लढ्यालाही बळकटी देण्यात येणार असून, दिव्यांग बांधव आणि शेतकरी हे एकत्र येऊन समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संघटनेने जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना कोणत्याही गट-तटाचा विचार न करता दिव्यांग या एका झेंड्याखाली एकत्र या, नागपूरला चला! असे म्हंटले आहे. प्रत्येक दिव्यांग बांधवाने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढा देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
