खटले तडजोडीने मिटवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- न्यायालयांवरील प्रचंड प्रलंबित खटल्यांचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने अहमदनगर बार असोसिएशनने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जवळपास एक हजार सभासद असलेल्या या संघटनेतर्फे, किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त खटले परस्पर संमतीने निकाली काढण्यात यशस्वी ठरलेल्या वकिलांना लोक-न्यायदूत! हा मानाचा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे यांनी दिली.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पर्यायी वाद निवारणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. सध्या देशभरात पन्नास दशलक्षांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. यापैकी बरेचसे वाद हे अहंकाराच्यामुळे वादामधून, मालमत्ता तंट्यांमधून किंवा किरकोळ कारणांमधून निर्माण झालेले आहेत.
वकील हे पक्षकारांच्या मानसिकतेचा अचूक वेध घेऊ शकतात आणि त्यांना समझोत्याकडे वळवू शकतात. आमचा हा प्रयत्न न्यायिक एंट्रॉपी कमी करण्याचा असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातारे यांनी म्हंटले आहे.
लोकअदालत अनेक वर्षांपासून कार्यरत असले तरी, प्रभावशाली वकिलांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास त्याचे परिणाम अधिक प्रभावी ठरतील, असा बार असोसिएशनचा विश्वास आहे. या सन्मानामुळे संपूर्ण विधिजीवी समाज या मोहिमेत सहभागी होईल आणि अनेक खटले तडजोडीने मिटतील, अशी अपेक्षा वकिलांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे पाटील, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव, सचिव ॲड. संदीप बुरके, सहसचिव मनीषा केळगंद्रे, महिला सहसचिव जया पाटोळे, खजिनदार अनुराधा येवले, कार्यकारणी सदस्य अभिजीत देशमुख, रामेश्वर कराळे, निखिल ढोले, विजय केदार, दीपक आडोळे, शिवाजी शिंदे, ज्योती हिमणे आदींनी प्रयत्न सुरू ठेवला आहे.
लोक-न्यायदूत ही संकल्पना ज्येष्ठ वकील आणि सामाजिक विचारवंत ॲड. कारभारी गवळी यांनी मांडली आहे. त्यांच्या मते, परस्पर समझोत्याने खटले निकाली काढल्याने केवळ प्रलंबित खटल्यांचा भार कमी होत नाही, तर समाजात सौहार्द आणि शांततेचे वातावरणही निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
