सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या; बोनस व शैक्षणिक मदतीतही वाढ
कामगार संघटना आणि ट्रस्टमध्ये सलोख्याने तडजोड; सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियन आणि अवतार मेहेर बाबा ट्रस्ट यांच्यातील नवीन वेतनवाढ करार बुधवारी (दि. 4 जून) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पार पडला. सहाय्यक कामगार आयुक्त रे. मु. भोसले यांच्या उपस्थितीत युनियनचे पदाधिकारी आणि ट्रस्टच्या विश्वस्तांनी करारावर स्वाक्षऱ्या करून पुढील तीन वर्षांसाठी कामगारांच्या वेतन व विविध सुविधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला.
सन 2023 ते 2026 या कालावधीतील विद्यमान करार मार्च 2026 मध्ये संपुष्टात आल्यानंतर नवीन करारासाठी कामगार संघटना आणि ट्रस्ट यांच्यात अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्या. दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कोणताही औद्योगिक वाद निर्माण न होता तडजोडीने हा करार करण्यात आला. यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात डिमांड नोटीस सादर करण्यात आली होती.
नवीन करारानुसार सन 2026 ते 2029 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कामगारांना एकूण ₹4,800 इतकी वेतनवाढ देण्यात येणार आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून दरवर्षी ₹1,600 प्रमाणे वेतनवाढ मिळणार आहे. याशिवाय दिवाळी बोनस व भेट रक्कम मिळून पूर्वीपेक्षा ₹1,500 ची वाढ करण्यात आली असून आता कामगारांना ₹9,500 इतका बोनस मिळणार आहे. कामगारांच्या कुटुंबीयांच्या शैक्षणिक गरजांचाही विचार करण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पात्रतेनुसार ₹25 हजारांपर्यंत शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पूर्वी मिळणारे इतर सर्व लाभ नियमांनुसार कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नवीन करारावर स्टच्या वतीने विश्वस्त रमेश जंगले व युनियनच्या वतीने लाल बावटाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. ॲड. सुभाष लांडे, युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी व्यवस्थापन लेबर ऑफिसर श्रीनिवास वंगार यांच्यासह उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, सुभाष शिंदे, प्रविण भिंगारदिवे, सुनिता जावळे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, चंद्रकला देशमुख, श्रीनाथ पाटोळे, रामदास कल्हापूरे, गणेश गहिले, राजेंद्र मोरे, दिगंबर माने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना युनियनचे नेते कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, ट्रस्टसोबत संघटनेचा हा चौथा करार असून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिल्यामुळे किमान वेतनासह विविध लाभ मिळवून देण्यात यश आले आहे. वाढत्या महागाईच्या काळात कामगारांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी वेतनवाढ आवश्यक होती. ट्रस्टने सकारात्मक भूमिका घेत करारासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी सांगितले की, आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. संघटना स्थापन होण्यापूर्वी अनेक कामगार अत्यल्प वेतनावर काम करत होते आणि त्यांना विविध लाभांपासून वंचित राहावे लागत होते. मात्र संघटनेच्या संघर्षशील भूमिकेमुळे आणि ट्रस्टशी साधलेल्या समन्वयातून कामगारांना न्याय्य हक्क मिळाले आहेत. श्रमिकांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, हीच संघटनेची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले यांनी सांगितले की, कामगारांशी समन्वय आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून हा करार करण्यात आला आहे. संघटनेशी संबंधित कामगारांबरोबरच ट्रस्टमधील सर्व कर्मचाऱ्यांना या कराराचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार यांनी सांगितले की, अवतार मेहेर बाबा ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात काम करताना युनियनच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. कामगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत ट्रस्टने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या करारामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यातही कामगारांच्या हितासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.
