शरद पवार यांच्या जीवनावरील व्याख्यानाने विद्यार्थी भारावले
स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता येत नाहीत -अभिषेक कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता येत नाहीत. खेळात यश, अपयश येत असते, मात्र खिळाडूवृत्तीने त्याचा सामना केल्यास स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होते. मैदानी खेळ खेळून शरीर व मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचे आवाहन माजी महापौर तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर यांनी केले.

कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी कळमकर बोलत होते. अर्जुनराव पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी व्याख्याते गणेश भोसले, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, कैलास मोहिते, कृष्णा मोरे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर विद्यालयात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या जीवनावर व्याख्याते गणेश भोसले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात शिवाजी लंके यांनी क्रीडा स्पर्धेने मुलांचा सर्वांगीन विकास साधला जातो, शिक्षणाबरोबर शारीरिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ तेवढेच महत्त्वाचे आहे. संस्थेचे अध्यक्ष ना. शरद पवार यांना खेळाची आवड असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्याख्याते गणेश भोसले यांनी शरद पवार यांच्या जीवनातील संघर्ष, राजकारण व समाजकारणातील योगदान व देशाला दिशा देणारे बहुआयामी नेतृत्वाचा उलगडा केला. राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांनी आपला दबदबा आजही राखला असून, शेतकऱ्यांचा विकास साधून त्यांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श समोर ठेवून जाती-धर्माला थारा न देता, माणुसकीची जात त्यांनी जपल्याचे ते म्हणाले. तर विद्यार्थ्यांना जितक्या लवकर ध्येयाकडे वाटचाल करता येईल तितक्या लवकर वाटचाल केल्यास यश लवकर मिळणार असल्याचे सांगितले.

अर्जुन पोकळे म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातला दिशा दिली. सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शिक्षण क्षेत्र पिढी घडवते व त्यामुळे राष्ट्र प्रगत होते. हा विचार समोर ठेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्थेत जातीने लक्ष देऊन बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. महिला आरक्षणाचे धोरण राबवून, महिलांना त्यांनी संधी मिळवून दिली. यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तर जीवनातील खरे आयडॉल शोधून त्यांच्या प्रेरणेने वाटचाल केल्यास प्रगतीच्या वाटा सापडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेत विविध क्रीडा स्पर्धा रंगल्या होत्या. तर शरद पवार यांच्या जीवनावर व्याख्यानाने विद्यार्थी भारावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले.
