• Tue. Jul 22nd, 2025

लहुजी शक्ती सेनेची नागपूरच्या दिशेने निघालेल्या पदयात्रेचे शहरात स्वागत

ByMirror

Nov 21, 2023

फुलांचा वर्षाव, हलगीचा निनानादात विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी

शहरातून पदयात्रेचे मार्गक्रमण

अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पुणे येथून निघालेली पदयात्रा मंगळवारी (दि.21 नोव्हेंबर) शहरात दाखल झाली. या यात्रेचे शहरात मातंग समाजाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.


पदयात्रेत सहभागी असलेले लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर हलगीच्या निनादात या पदयात्रेचे शहरातून मार्गक्रमण झाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पदयात्रा आयुर्वेद चौक, नेप्ती नाका, दिल्ली गेट मार्गे सिध्दार्थनगर येथे पोहचली. या पदयात्रेत पिवळे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या युवकांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन विष्णूभाऊ कसबे यांनी समाजबांधवांशी संवाद साधला.


या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, संपर्क प्रमुख जयवंत गायकवाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, युवक जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे, विजय पठारे, शहराध्यक्ष पावलस पवार, लखन साळवे, उत्तम रोकडे, नवनाथ शिंदे, सिताराम शिरसाठ, विष्णू डाडर, लखन शिरसाठ, अजय शिरसाठ, किरण शिरसाठ, गणेश दिनकर, शंकर तायडे, अनिकेत हजारे, अमित जाधव, मुकेश खरात, अरविंद वायदंडे, बाळू भगत, सुनिल सकट, मधुकर सकट आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विष्णूभाऊ कसबे म्हणाले की, लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे येथील तालीम पासून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. 27 दिवसानंतर ही पदयात्रा नागपूरच्या विधानभवनावर धडकणार आहे. या हिवाळी अधिवेशनात समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण कराव्या. मागील आंदोलनात नग्नावस्थेत मंत्रालयात धडक मारण्यात आली होती. यावेळी देखील हटके आंदोलन केले जाणार आहे. 16 डिसेंबरला लहुजी शक्ती सेनेचे आक्रमक पद्धतीचे आंदोलन राहणार असून, राज्य सरकारने निघालेल्या पदयात्रेची भावना लक्षात घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सरकार सक्षम लोकांबद्दल विचार करते. मात्र उपेक्षित घटकांना आरक्षणाचा लाभ देत नाही. मातंग समाजातील तरुणांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका, अन्यथा व्यवस्थेला परवडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.


सुनील शिंदे म्हणाले की, मातंग समाज वर्गवारी आरक्षणासाठी पेटून उठला आहे. समाजाच्या भावना लक्षात घेऊन मागण्या पूर्ण कराव्या. विष्णूभाऊ कसबे यांचे पाय रक्तबंबाळ होऊनही ते या पदयात्रेत चालत असून, समाजाने देखील या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तर राज्य सरकारने या आंदोलना मागची भूमिका व भावना लक्षात घ्यावी. अन्यथा मोठी किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अनुसूचित जातीला एकत्रित 13 टक्के आरक्षण असून, अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समावेश करावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडल्याने समाजातील युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असताना हे महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करून पुन्हा सुरु करावे या प्रमुख मागण्या घेऊन नागपुरच्या हिवाळी अधिवेशनवर लहुजी शक्ती सेनेची पदयात्रा धडकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *