• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

पगारवाढीसाठी अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची निदर्शने

ByMirror

Nov 20, 2023

तारखेवर तारखेने कामगार वर्ग संतप्त; पुढील तारखेस तोडगा न निघाल्यास कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा

करार संपून आठ महिने उलटले, सात ते आठ वेळा सुनावणी होऊन निर्णय नाही

अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियन व ट्रस्टच्या नवीन करारसंदर्भात पाच ते सात वेळा सुनावणी होऊन देखील पगारवाढीवर तोडगा निघत नसल्याने संतप्त कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयापुढे निदर्शने केली. तर पुढील तारखेस विश्‍वस्तांनी पगारवाढीच्या करारावर तोडगा न काढल्यास कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.


पगार वाढ मिळण्यासाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुनील दळवी, सुभाष शिंदे, प्रभावती पाचरणे आदींसह युनियनचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनास स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी पाठिंबा दिला.


अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली आहे. युनियन व ट्रस्टमध्ये पुढील तीन वर्षासाठी करार होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. 2020 मध्ये झालेल्या करारात कामगारांना 4750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. महागाईच्या काळात कामगारांना जीवन जगणे अशक्य झाले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मागील वेळी दिलेल्या 4750 पुढे वेतनवाढ मिळाल्यास कामगारांची सहमती असणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ट्रस्टने 3 टक्क्यांची दिलेली पगारवाढची ऑफर कामगारांनी नाकारली आहे.


कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, अवतार मेहरबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी संपूर्ण जगातून भाविक येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्ट बनविण्यात आली असून, या ट्रस्टमध्ये दोनशे ते सव्वादोनशे कामगार आहेत. त्यांचा पगार अत्यंत कमी होता. वेळोवेळी आंदोलन करुन व नवीन कराराने त्यांचा पगार वाढला. मात्र महागाईच्या काळात त्यांना असलेला पगार तटपुंजा असून, त्यामध्ये त्यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. नवीन करारासाठी पाच ते सात तारखा झाल्या, पण ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी पगारवाढीच्या करारावर तोडगा काढलेला नाही. विश्‍वस्तांनी कामगारांचा विचार करून निर्णय घ्यावा. अवतार मेहेरबाबांनी नेहमीच गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून विश्‍वस्तांनी मनाचा मोठेपणा दाखवून कामगारांना प्रपंच चांगल्यारित्या चालेल अशी पगार वाढ देऊन हा प्रश्‍न मिटविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


सतीश पवार म्हणाले की, करार संपून आठ महिने झाले आहे. विश्‍वस्तांनी अजून निर्णय घेतलेला नाही. वारंवार तारखा सुरू असून, कामगारांच्या संयमाचा अंत पाहू नये. चर्चेने प्रश्‍न सोडवावा, कामगारांना उपोषण व संपाची वेळ आणू नये, असे त्यांनी सांगितले. ट्रस्टने महागाईच्या काळात देऊ केलेली 3 टक्के पगारवाढ ही कामगारांची थट्टा असून, ही पगारवाढ कोणत्याही कर्मचारीला मान्य नसल्याचे विजय भोसले यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *