सर्जेपूरा परिसरात चिमुकलीच्या कल्पकतेचे कौतुक
नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हणजे आनंद, श्रद्धा आणि सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ. या उत्सवात सर्जेपूरा येथील क्रिशा हितेश गुप्ता या चिमुकलीने साकारलेल्या अष्टविनायक दर्शन या घरगुती देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घरगुती पातळीवर साकारलेला हा देखावा आकर्षक व भक्तीमय वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.
क्रिशा गुप्ता ही एमआयडीसी येथील डॉ. विठ्ठलराव विखे फाऊंडेशन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता 9 वीत शिकत आहे. ती पंजाबी राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांची नात आहे. लहान वयातच तिच्या कल्पकतेला आणि कलाविष्काराला साथ देत कुटुंबाने या देखाव्याची मांडणी केली आहे. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करुन सजविण्यात आलेल्या अष्टविनायक दर्शनासाठी परिसरातील नागरिकही हजेरी लावत आहे.
अष्टविनायकाचे एकत्र दर्शन मिळावे, ही अनेकांची इच्छा असते. हीच संकल्पना लहानग्या क्रिशाने घरगुती पातळीवर साकारत प्रत्येक मंदिराची रचना सुबकपणे मांडली आहे. अष्टविनायकाच्या इतिहास व महत्त्वाविषयी माहिती गोळा करुन तिने तो देखाव्यात प्रतिबिंबित केला आहे.