पुणे संघाकडून खेळताने मिळवले विजेतेपद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील उदयोन्मुख खेळाडू कार्तिक रत्नेश मिश्रा याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 75व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या संघाने विजेतेपदाचा मान पटकावला, आणि या विजयात कार्तिकने महत्त्वाची भूमिका बजावली.
ही ऐतिहासिक कामगिरी टीम इंडियाचे माजी खेळाडू सिद्धांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय संपादन केला. कार्तिक मिश्राने आपल्या वेगवान खेळी, चपळ बचाव आणि निर्णायक क्षणी केलेल्या गुणांसह संघाच्या विजयासाठी मोठं योगदान दिलं. कार्तिक मिश्रा हा केवळ बास्केटबॉलपुरता मर्यादित नसून, आईस हॉकी स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग या क्रीडाप्रकारातही त्याने देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने “खेलो इंडिया” स्पर्धेत आईस हॉकी स्केटिंग प्रकारात आपली चुणूक दाखवली होती. याचबरोबर, दुबई येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत स्केटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली होती.
कार्तिक मिश्रा हा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी असून, सध्या तो भारती विद्यापीठ, पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. कार्तिकचा क्रीडा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याची आई अनुराधा मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावून शहराचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
